Saturday, October 11, 2014

"9 ऑक्टो जागतिक टपाल दिनानिमित्त.."

दि.9 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक टपालदिन म्हणुन साजरा केला जातो.UPU द्वारा या दिवसाची घोषणा टोकियो येथे  करण्यात आली. UPU म्हणजे युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना स्विसची राजधानी बर्न येथे 1874 साली झाली.


संपूर्ण जगात हा दिवस साजरा करण्याचा हेतू हाच आहे की,या दिवसानिमित्ताने जनजागृती व्हावी.पोस्टाच्याकामाचीमाहीतीव्हावी.समाजामधे पोस्टाचे महत्व वाढीस लागावे.या दिवशी जगातील अनेक देशात वर्किंग हॉलिडे पाळला जातो. या दिवसाचे महत्व जाणून  कांही देशात नवनवीन योजना जाहीर केल्या जातात आणि त्या राबवल्याही जातात.उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना पुरस्काराने सन्मानित केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.कांही ठिकाणी नवीन टपाल तिकिटांचे विमोचन केले जाते.सार्वजनिक ठिकाणी जाहिराती केल्या जातात तसेच स्मरणिकाही काढल्या जातात.
    जसा 9 ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन तसा 10 ऑक्टोबर भारतीय टपालदिन म्हणून साजरा केला जातो. तसेच पोस्टल सप्ताह सुद्धा पाळण्यात येतो.भारतीय टपाल विभागाची एकंदरीत माहीती आपण जाणून घेवु .
संपूर्ण भारतभरात एकूण 1,54,866 टपाल कार्यालय आहेत त्यापैकी एकूण 1,39,040 कार्यालयॆ ग्रामीण भागात तर15,826 कार्यालये शहरी भागात आहेत.या पैकी 25464 कार्यालये डिपार्टमेंटल तर 1,29,402 कार्यालये एक्स्ट्रा डिपार्टमेंटल आहेत.
  भारतीय टपालखाते दळणवळणाशिवाय बँकिंग सेवासुद्धा पुरवते.भारतामध्ये टपालसेवेचे एकूण 22 सर्कल असून त्या प्रत्येक सर्कलचा प्रमुख भार मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचेकडे असतो शिवाय सर्कलचे कांही रिजन असतात त्यांचाभार विभागीय पोस्टमास्तर जनरल यांचेकडे असतो.या 22 सर्कल शिवाय उर्वरित भाग आर्मी फ़ोर्स ऑफ़ इंडिया कड़े सोपवला आहे.त्याच्या मुख्यपदी डायरेक्टर जनरलआर्मीपोस्टलसर्व्हिसेस.असता
   ब्रिटीश कालावधीत (1858-1947)भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन असताना फक्त 881 टपाल कार्यालये होती.ब्रिटीश काळात पोस्टाच्या बाबतीत काही महत्वाचे ठराव पास झाले त्यापैकी बचत-बँक कायदा 1873 हा 28जाने.1873 रोजी पारित झाला.आणि 1881 पासून अमलात आला. दि.1एप्रिल1882 पासून पोस्टामध्ये बचत बँक कामास सुरुवात झाली.तसेच 1884 सालापासून कर्मचारयांचे हित लक्षात घेउन पोस्टल लाईफ इन्शुरन्स सुरु झाला.स्वातंत्र्यानंतर भारतीय टपाल विभागाची योग्य दिशेने प्रवास सुरु झाला.
       भारतात सर्वात उंच ठिकाणी (हिक्किम)पोस्ट ऑफिस असून त्याचा पिन कोड 172114 असा आहे .टपाल विभागात पिनकोड सेवेला 15 ऑगस्ट 1972 रोजी सुरुवात झाली.योग्य पिनकोड लिहीला तर पत्राचा प्रवास लवकर होण्यास मदत होते.टपाल विभागाचा आणखी एक महत्वाचा विभाग म्हणजे तिकिट प्रकाशन विभाग(फिलाटेलिक ब्यूरो).हा विभाग पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि वेळो-वेळी नवनवीन तिकिटांचे प्रकाशन या मार्फ़त होत असते.देशातील सांस्कृतिक घडामोडीचे प्रतिबिंब तिकीटातून घडत असते.कला,साहित्य,क्रीडा या सर्व गोष्टींचा समावेश टपाल तिकिटातुन होतो.विश्वबंधुत्व,एकोपा,सलोखा हा टपाल तिकिटाचा गाभा मानला जातो.भारतातील पहिले टपालतिकिट1ऑक्टोबर 1854 रोजी प्रकाशित झाले होते.परंतु स्वातंत्र्यानंतर पाहिले भारतीय तिकिट महात्मा गांधी यांच्यावर विमोचित केले गेले.त्यावेळी त्याची किंमत फक्त अर्धा आणे होती.  कॉमन वेल्थ राष्ट्रापैकी भारत असा देश आहे की ज्याने पहिली एअरमेल सेवा दिली.
पोस्टखात्याची वैशिष्ट्यपूर्ण सेवा म्हणजे "पोस्टल लाईफ इन्शुरन्स"(डाक जीवन विमा)या योजने अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचारी,राज्याचे कर्मचारी,राष्ट्रीयकृत बँक कर्मचारी,म्युनिसिपल कॉर्पोरेशन कर्मचारी,शैक्षणिक संस्था,वित्तीय संस्था मधील कर्मचारी याना लाभ घेता येतो.याशिवाय ग्रामीण भागातील जनतेसाठी ग्रामीण डाक जीवन विमा सुद्धा घेता येतो.
काळानुरुप भारतीय टपाल विभागाने कात टाकायला सुरुवात केली.नवीन तंत्रज्ञान आपलेसे करायला सुरुवात केली.1991 पासून पोस्टात संगणक आला तो मल्टीपर्पज काउंटर मशीन सेवेस्वरुपात.2008 सालापासून  "project arrow"हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यास टपाल खात्याने सुरुवात केली.याचा मुख्य हेतू हाच की,कर्मचारी आणि ग्राहकामधे विश्वासार्हता वाढावी,कामाचे सुसूत्रीकरण व्हावे,कामात पारदर्शक यावी,टपाल वितरण जलद आणि सोपे सुलभ व्हावे.अश्या या महत्वाकांक्षी प्रकल्पास "prime ministers award for excellence in public administration" हा गौरव पुरस्कारही प्राप्त झाला.
  पोस्टाच्या नवीन योजनेपैकी इलेक्ट्रानिक मनिआर्डर ही सेवा अतिशय लाभदायी आहे.काही क्षणात( मनिआर्डर) एका क्लिक वर हव्या त्या स्थळी पोहोचू शकते.दूसरी सेवा म्हणजे स्पीडपोस्ट ."Track and trace"या पद्धतीमुळे आपण पाठवलेले स्पीडपोस्ट सध्या कुठल्या टप्प्यावर आहे हे समजते.याशिवाय परदेशातून कांही सेकंदात आपले पैसे "international money transfer"या सेवे अंतर्गत मिळण्याची सोय निवडक टपाल कार्यालयात उपलब्ध आहे.देशांतर्गत सेवेत"मनीग्राम"ही सेवा अशाच पद्धतीत मोडते.ठराविक ओळख,कायदेशीर पुरावा,सोबत असेल तर पैसे त्वरित मिळतात.या सेवांव्यतिरिक्त व्हिपी लेटर,व्हिपी पार्सल,एक्सप्रेस पार्सल,इन्शुअर्ड या सेवाही अतिशय पारदर्शी आहेत.आता सर्व प्रकारची पंजीकृत पत्रे ऑनलाइन तपासता येतात त्यामुळे कामात पारदर्शकता आली आहे.
जुन्या काळातील पोस्ट ऑफिस आणि सध्याचे पोस्ट ऑफिस मधे अमुलाग्र बदल झाल्याचे अनुभवण्यास मिळते.या सेवां सोबत पोस्टाची बँकिंग सेवा सुद्धा चांगली आहे.आजही सुरक्षित ठेव ठेवायची असेल तर पोस्टासारखा उत्तम पर्याय नाही असे जाणकार आणि तज्ञ मंडळीचे मत आहे आणि ते खरेही आहे. बचत बँक,आरडी,मुदतठेव,वरिष्ठ नागरिक योजना,पीपीएफ, मंथली इनकम स्कीम,राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे सर्व व्यवहार आता ऑनलाइन पद्धतीने केली जातात त्यामुळे या कामातही पारदर्शीपणा आपसुकंच आला आहे.कामामधे सुसुत्रता येत चालली आहे.याशिवाय मनरेगा सारख्या योजना अतिशय प्रभावीपणे टपाल खात्या मार्फ़त चालु आहेत.
कोर बँकिंगच्या दृष्टीने टपालखाते हळु -हळु परंतु  खंबीर आणि दमदार पावले टाकीत आहे."कॅश ऑन डिलीवरी" सारखी सेवा हे सुद्धा खात्याचे नवीन पाउल आहे.प्रसादम सारखी योजनाही यशस्वी करण्यात टपाल खात्यास यश येत आहे.ज्या भक्ताना तीर्थक्षेत्री जाता येत नाही अशा भक्ताना ठराविक रक्कम भरुन प्रसाद घरपोच मिळु शकतो .याशिवाय दैनंदिन मधे लाईट बिल,टेलीफोन बिल पोस्टात भरली जाऊ शकतात.अनेक स्पर्धा परीक्षाअसतात त्याची प्रवेश फी ऑनलाइन भरायची असते त्याचीही सोय पोस्टामार्फ़त केली जाते.सर्व कॅश पेमेंट इ- पेमेंट स्वरूपात सहज शक्य झाले आहे.
टपाल खात्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येथील प्रत्येक कर्मचारी कटिबद्ध आहे आणि तो तितक्याच  प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले योगदान देत आहे! त्यामुळे आधुनिकतेची कास धरत माहीती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खातेसुद्धा तितक्याच समर्थपणे वाटचाल करीत आहे यात अजिबात शंका नाही!! अश्या या उज्वल परंपरा असलेल्या टपाल खात्याला पुन्हा वैभवाचे दिवस नक्कीच दिसतील! "आज जागतिक टपालदिन" त्यानिमित्ताने सर्व टपाल कर्मचारी आणि त्याच्या ग्राहकाना (जनतेला) "हार्दीक शुभेच्छा!!"

@@@@@@@@########@@@@@
(माहिती संकलन: प्रमोद.क.कुलकर्णी. औद्योगिक वसाहत टपाल कार्यालय सातपूर नाशिक 7)


Related Posts Plugin for WordPress, Blogger...